Rashtrasant Tukdoji Maharaj राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील ग्रामशुद्धी
स्वच्छ आदर्श गाव हाच राष्ट्राचा पाया आहे. गावात चांगला बदल
करण्यासाठी काय करावे…?अस्वच्छपणाची प्रवृत्ती नष्ट होऊन गावात सहयोगवृती वाढीस लागेल. सर्वांनी मिळून काम केल्याने उच्च- नीचताची भावना नष्ट होऊन प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होईल.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेत ग्रामशुद्धी कशी केली जाते. ग्रामशुद्धीच्या सूत्री कोणत्या आहेत…?कशामुळे गावात स्वच्छता नांदेल व गावचे आरोग्य धोक्यात येणार नाही….?गावाच्या विकासाचा मूलमंत्र काय..? ग्रामगीता ग्रंथाच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांनी सांगितले आहे. भारत देश हा खेड्यांचा देश आहे. बहुसंख्य लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. शेती हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. खरा भारत हा खेड्यात आहे म्हणून महात्मा गांधींजीने खेड्याकडे चला हा संदेश दिला होता.
स्वच्छ आदर्श गाव हाच राष्ट्राचा पाया आहे. गावात चांगला बदल
करण्यासाठी काय करावे…?अस्वच्छपणाची प्रवृत्ती नष्ट होऊन गावात सहयोगवृती वाढीस लागेल. सर्वांनी मिळून काम केल्याने उच्च- नीचताची भावना नष्ट होऊन प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होईल.
आपला देश हा खेड्यांचा आहे. तेथे रहाणा-या खेडूतांच्या सामाजिक, आर्थिक, मानसिक स्थितीत सदोदित उन्नती होत रहावी, या दृष्टीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कांही महत्त्वाचे सूत्रे ग्रामगीतेत सांगितले आहेत.
ग्रामशुद्धी:–
ग्रामशुद्धी अभावी गाव कसे दिसते यांचे चित्रण मांडतात ते लिहितात.
“कागदी पुस्तकात, काव्यात, |खेड्यांचे वर्णन दिव्य बहुत |
परि वस्तूस्थिती पाहता तेथ | क्षणभरी ही न रहावे ||”
गावात राहणारे लोक सार्वजनिक स्वास्थ्यांप्रती उदासिन झाले आणि केवळ उपभोगाची भावना वाढतच गेली तर त्यांच्याकडून ग्रामशुद्धीचे कामे कशी होणार…? गाव सभोवताल गोदरी वाढून वातावरण दूषित होणारचं. रस्त्यावर घाणीचे साम्राज्य राहणार. पाण्याचे डबके साचणार. यामुळे अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार. ज्या ज्या गावात आरोग्याचे प्रश्न उपस्थित आहेत त्या गावातील ग्रामपंचायत सदस्य व गावकरी लोकांनी एकत्र येऊन ग्रामशुद्धीचे कामे करावी. रोज ग्राम सफाई करावी. गावातील सर्व पुरुष, महिला, लहान मोठे सर्वांनी मिळून गाव स्वच्छता करावी. घरातील पाणी रस्त्यावर जाऊ नये यासाठी शोषखड्डे करावे. नाले स्वच्छ करावे. रस्त्यावर पडलेले काच, कचरा, गोबर, काटे, खिळे उचलून घ्यावे. जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या पायास इजा होणार नाही. गावची दुरावस्था रोखण्यासाठी प्रत्येकानी आपले काम पूर्ण करावे. स्वच्छ आदर्श गाव हा राष्ट्राचा पाया असून तो पक्का करण्यासाठी बुद्धीवादी लोकांनी विशेष लक्ष खेड्याकडे दिले पाहिजे. खेड्यातील लोक अनुकरणशील असतात. पण अलिकडे खेड्यातील लोक धंदा, नोकरीसाठी शहराकडे धावत आहेत. ते शहरात वास्तव्य करतात व गावाकडील संपर्क कमी होतो. श्रमदान करून आपले गाव स्वच्छ ठेवले पाहिजे.
रामधून, रामटाळी:–
मित्रहो, रामधून नाही आजची |
ही आहे परंपरा प्रदक्षिणेची |
प्रदक्षिणेत योजना होते कार्याची |
तीच आहे रामधून ||
पूर्वी गावात दिंड्या पालखीची पद्धत होती. साधुसंतांनी सुरू केलेली पद्धत गावाला निर्मळ बनवण्यासाठीच होती. कालपरत्वे पद्धत बंद पडली व केवळ दिंड्या काढणे सुरू झाले आणि रस्ते अस्वच्छ राहू लागले. सेवा मंडळाच्या माध्यमातून रामधून कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
“म्हणूनीच काढली रामधून |
व्हावयासी गावाचे पुननिर्माण |
सेवा मंडळ संस्थेतून |
उदय केला कार्याचा ||”
वास्तविक रामधून म्हणजे ग्राम निरीक्षणाचा महत्त्वाचा कार्यक्रम. गावच्या श्रमदानातून स्वच्छतेचे काम पूर्णत्वास जावे ही योजना.
रामदासी निघण्यापूर्वी रस्ते झाडून स्वच्छ करून सडासंमार्जन व रांगोळी काढावी. दारावर आंब्याची पाने तोरण म्हणून बांधावे. यामुळे घरोघरी सौंदर्य दृष्टी विकसित होईल. राष्ट्रसंताच्या भजनाचा मनावर परिणाम होईल. गावात चांगल्या बदलास सुरुवात होईल. अस्वच्छपणाची प्रवृत्ती नष्ट होऊन गावात सहयोगवृती वाढीस लागेल. सर्वांनी एकत्र मिळून काम केल्याने उच्च निच भावना नष्ट होईल. गावात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होईल.
“रामधूनची ऐका रीती |
आधी करा ग्रामशुद्धी ती |
जेणे स्नान घडे गावाप्रती |
आरोग्यदायी ||”
प्रत्येक व्यक्तीचा विकास समुदायाकडून क्रमाक्रमाने होत असतो. समुदायाकडून त्यास सुरक्षितता, आधार व कार्याचा सन्मान मिळत असतो. ग्रामसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मदत केली पाहिजे. व्यष्टी ते समेष्टी हे उदिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामस्थांद्वारा संत बोधावर आधारित विवेकनिष्ठ तत्वविचार प्रणाली अंमलात आणली पाहिजे. गावातील सुजाण कार्यकर्ते एकत्रित येऊन गाव सुधारणा केली पाहिजे.
जनजागृती:–
खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा |
झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा ||
गावात अनेक प्रकारचे लोक असतात. त्यापैकी काही लोक चांगल्या कामाचे अनुकरण करणारे असतात. नित्यनेमाने सेवा करणा-या कार्यकर्त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव इतरावर पडला की ते शुद्ध भावनेने काम करण्यास मदत करतात.
कोणत्याही घरचे लग्न असो तो लग्न सोहळा आपल्या घरचा समजून लोक मदत करत. स्त्री या स्वयंपाक करीत, पुरुष मंडप, मांडव ऊभा करीत. तरूण पंक्ती वाढण्याचे काम करीत. अलिकडे शहरी संसकृतीने बरीच ग्रामीण संस्कृतीत घुसखोरी केली आहे. गावातील कारागीर गाव सोडून शहरात जात आहे. गावात होणारे विवाह खर्चिक झाले आहेत. स्वावलंबी गाव आता परावलंबी झाले आहे. आपुलकी नाते, जिव्हाळा कमी झाला आहे. कार्यक्रमात कृत्रिमता आली आहे. विश्वास कमी झाला आहे.
“स्वच्छता आणि पवित्रता | शुद्धता आणि नैसर्गिकता |
गावचे उद्योग मागासले| त्यात शिक्षणाने पुन्हा उजळीले|
ऐसे असावे सुधारले| गाव आमुचे ||”
लोकसहभाग:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चिंतनसृष्टीचा केंद्रबिंदू गाव आहे. गावातील सामान्य माणूस आहे. लोकसहभागातून सुंदर गाव बनवण्याचा विचार संतांनी सांगितला
आपल्या गावचे रक्षण आम्ही करू. घरफोडी, चोरी, अवैध कामांना आळा घालू. गावातील तंटे सामोपचाराने गावात मिटवू. गावात शांतता, सुव्यवस्था कायम राखू. गावचे संरक्षण करू. सेवा भाव मनात ठेवून कार्य करु.
“यानेच गाव होईल आदर्श |
बलवान बनेल सर्व देश |
मानव समाजाचा उत्कर्ष |
होईल सर्वतोपरी ग्रामगीता ||”
रत्नाकर बाबुराव पाटील [सहशिक्षक] विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा, शिंगोली ता. जि. धाराशिव
मो. ९४०३३९४८१८