Na dho mahanor ना. धों. महानोर यांच्या “रानातल्या कविता”*
…………………………….
इ. स. १९६७ साली पाॅप्यूलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांनी ‘नवे कवी नवी कविता’ या योजने अंतर्गत ना. धों. महानोर यांचा ‘रानातल्या कविता’ हा कविता संग्रह प्रसिध्द केला.त्यानंतर त्यांचे
‘वही’, ‘पळसखेडची गाणी’ , ‘अजिंठा’,’ हे खंडकाव्य ‘पानझड’,’ पावसाळी कविता’,’प्रार्थना:दयाघना’ व ‘तिची कहाणी’ इत्यादी कवितासंग्रह प्रसिध्द झालेत. तसेच त्यांनी ‘गांधारी’ ही कादंबरी व ‘ऐसी कळवळ्याची जाती’ ही व्यक्तिचरित्रे लिहिलीत.
‘रानातल्या कविता’ या कवितासंग्रहाला विजया राजाध्यक्ष यांची अभ्यासपूर्ण ,सखोल चिंतनात्मक प्रदीर्घ प्रस्तावना लाभली. कवितांचे त्यांनी गुणदोषांसहित विश्लेषण केले.त्यामुळे कवितांची सर्वार्थाने ओळख होते.कवी व कवितेच्या संदर्भात त्यांचे विचार अत्यंत महत्वाचे वाटतात.” स्वत:चे व्यक्तिमत्व कवितेत आविष्कृत करणे, हा महानोरांचा उद्देश नाही.स्वत:च्या अनुभवाप्रमाणेच स्वत:कडे ही ते अवैयक्तिक दृष्टीने पाहतात,हे तर खरेच;पण रानाच्या व्यक्तिमत्वामुळे ही ते भारून गेले आहेत,त्यातच विरले आहेत. आणि ही समरसता इतकी असाधारण आहे की,बिंब कोणते आणि छाया कोणती ,हेच कळेनासे होते.रानात कवी आहे,कवीत रान आहे.”हीच समरसता व तादात्म्यभाव ह्या निसर्ग कवितांचे खास वैशिष्ट्य आहे.
” ह्या शेताने लळा लाविला असा असा की,
सुखदु:खाला परस्परांशी हसलो-रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो ”
(कविता क्र. १)
कवीचे रानावर प्रेम आहे. रानाचे ही कविवर प्रेम आहे. कवी रानाशी सुखदु:खाच्या गोष्टी सांगतात.आपल्या विविध रूपातून, विभ्रमातून, रंगांतून,नादांतून रान त्यांना प्रतिसाद देते.कविशी हीतगूज करते,कविला रानाची हिरवी बोली समजते, नव्हे कवी रानाच्या हिरव्या बोलीचा शब्दच होतो.त्यामुळे दोघांची अधिक जवळीक होते.एकमेकांवर त्यांचा जीव जडतो.
‘डोळे गच्च अंधारून .तेंव्हा माझे रान -रानातली झाडे मला फुले अंधरूण’
जन्मापासूनचे दु:ख जन्मभर असते.त्याचे कवीला फारसे काही वाटत नाही. सार्‍यांसाठी कवीने देहाचे सरण केले.पण, सगेसोयरे दूर गेले.आता फुले वेचतांना सुध्दा कवीचे मन ओथंबून येते.तेव्हा रानाचे ही डोळे गच्च अंधारून येतात. रानातील झाडे कवीसाठी फुले अंथरतात.वरील
दोन्ही कविता कवीचा रानाशी असलेला भावनिक संबंध उलगडून सांगतात.
“गुंतलेले प्राण ह्या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदूनी बेहोश होता
शब्दगंधे,तू मला बाहूत घ्यावे ”
(कविता क्र.२)
कवीला नभ आणि भूई यांचा भावसंबंध जाणवू लागतो. मातीतील चैतन्याचाही अनुभव येतो. डोळे भरून येतात. जीव तेथेच गुंतून राहतो.रानाच्या सहवासात कवीच्या आनंदाला ऊधान येते.फाटकी झोपडी त्याला प्राणाहूनही प्रिय वाटते. त्याला व्यथांचाही विसर पडतो.दु:खी,निराधार जीवनात रान हे सर्वस्व वाटते. ह्या बेहोशीतच कवी कवितेला शब्दगंधे ,तू मला बाहूत घ्यावे अशी प्रार्थना करतो.
” हिर्व्या पानात पानात काही चावळ चालते
भर ज्वानीतली ज्वार अंग मोडीत बोलते
शेत गव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते
आणि साळीचे उगाच अंग शहारून येते
पोटर्‍यातल्या गव्हाचे हसू ओंब्यात दाटते
केळ कातीव रूपाची छाया पाण्यात पाहते ”
(कविता क्र.१६)
महानोरांनी निसर्गाला देह दिला आहे.त्यांच्या कवितेत येणारा निसर्ग देहधारी आहे.अंग मोडीत बोलणारी भर ज्वानीतली ज्वार,नशेत झुलणारे पिवळ्या गव्हाचे शेत,उगाच अंग शहारून येणारी साळ,पोटर्‍यातल्या गव्हाचे ओंब्यात दाटलेले हसू आणि स्वत:ची सावली पाण्यात पाहणारी कातीव रूपाची केळ हे त्यांच्या कवितेत येणारे देहधारी निसर्गाचे अप्रतिम स्वरूप मनोवेधक असेच आहे.
” पाण्यात
एक साउली
हले बाहुली
थरकते ऊन
ही माल्हन म्हणते गान चंद्र माळून
बहकते रान ”
(कविता क्र. २९)
नदीचा काठ विस्तीर्ण आहे.सर्वत्र फुले आहेत.दाट फुलांची नक्षी आहे.ह्या गर्दीत वाट हरवून जाते.कुणी सैराट बावरा पक्षी नुस्ताच भिरभिरत राहतो.सगळाच प्रदेश अदभूत ,अनोळखी वाटतो.कोणी’माल्हन’ चंद्र माळून गान म्हणते.थरकत्या उन्हाला तिची सावली दिसते. रानाला मात्र ‘माल्हन’ ही दिसत नाही आणि तिची सावली ही दिसत नाही.फक्त गान ऐकू येते. मग रान ही भान विसरून जाते ते बहकते. हे रानाचे गहनगुढ चित्र मनाला अदभूत वाटते.
महानोरांच्या कवितेत येणार्‍या पाखरांच्या, झाडांच्या प्रतिमा लक्षवेधक आहेत.जसे की,’राजबन्शी पंखाचे एक पाखरू,’राजस पाखरू,’तिच्या कानात एक साळूंखी शब्द पेरते, ‘पाखरासारखा येऊन जा, ‘लक्ष पाखरांचे थवे,’पक्षी पंखात मिटले,’फांदीवर राघू,बोली अनोखी बोलले,’ ‘बोलघेवड्या साळूंखीचा शब्द रूखा-ओला’
झाडांच्या प्रतिमाही मनोवेधक आहेत. जसे की, ‘मोहाच्या झाडाला मोह व्हावा,’ ‘झाडे झिंगून जातात,’ ‘आंब्याच्या झाडाला मोहराचा वास झेपता झेपेना,’ ‘गाभुळ्या चिंचेला नवतीचा भार पोटी धरवेना,’ ‘झाडे झाली हिरवीशी,’ ‘अवघडलेले आडोशाला विवस्र शिल्पित हळदी झाड,’ ‘झाडांना फुटले डोळे,’ ‘पिक्या जांभुळाचे झाड,’ ‘बोरी वो बाभळी , मायेच्या झाल्या नारी,’ ‘झाडातून लदबदले बहर कांचनाचे,’ महानोरांच्या कवितेत येणारी पाखरे जी गूढ आहेत तशीच झाडेसुध्दा विविध प्रकारांची व स्वभावाची आहेत.तसेच ‘रानातल्या कवितेत’येणारे ऋतू ,प्रहर वेगवेगळ्या निसर्ग प्रतिमा आपापले रंग उधळीत राहतात.जसे की, ‘सांजावतांना वार्‍याच्या गंधगर्भ लयीनं आकाश ओथंबून येतं,’ ‘कलत्या सांजेचे सोनेरी ताटवे डोंगरझापीत खुलून उठतात,’ ‘दुपारच्या वेळी सुन्नाट सर्वत्र,’ ‘कशी बोलता बोलताच अवेळी सांज झाली,’ ‘ओळ जांभळ्या मेघांची वाहे नदीच्या पाण्यात,’ ‘केशर भिजली पिवळी उन्हे झाडांवर,’ ‘आणि आभाळालाही येतो गहिवर गर्द काळोखाचा’ अशा कितीतरी अतिमोहक निसर्ग प्रतिमा आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.
ना. धों. महानोर यांच्या ‘ रानातल्या कवितां ‘नी मराठी कवितेला वेगळे वळण दिले ती आशय अभिव्यक्तीच्या दृष्टीने अधिक समृध्द केली.आजही ‘रानातल्या कविता’ काव्यरसिकांना मंत्रमुग्ध करतात.

*प्रा. शांताराम हिवराळे*
पुणे