Bodhisattva of Bahujan: Dr. Babasaheb Ambedkar : बहुजनांचे श्रद्धास्थान बोधीसत्व: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय संविधानाचे शिल्पकार, दीन- दलितांचे कैवारी,महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य – कृतित्वाची माहिती जनसामान्य लोकांना व्हावी या उद्देशाने भीम जयंती साजरी केली जाते. भीम जयंती एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक सण,महा-उत्सव आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात शासकिय सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते.आंबेडकरवादी लोक या दिनाला “समता दिन” तर महाराष्ट्र सरकार “ज्ञान दिन” म्हणून ही जयंती साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महु गावी झाला. आई भीमाई व वडील रामजी सकपाळ. कोकणात “आंबेवड” या गावी रहात असल्यामूळे गावच्या नावावरून आंबडवेकर व नंतर गुरूजींनी आंबेडकर हे नाव ठेवले. भारतीय न्यायशास्त्रज्ञ, राजकारणी व महान समाज सुधारक म्हणून ओळख निर्माण केली. दलित बौद्ध चळवळ ऊभी करून जनतेला प्रेरणा दिली. अस्पृश्य- दलित लोकाविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. महिला व कामगार हक्कांविषयी लढा दिला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थेतून अर्थशास्त्र विषयात पी.एच .डी.पदव्या मिळवल्या. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयात संशोधन केले. भारतीय अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक व वकील असी आरंभीची त्यांची कारकीर्द सुरू होती. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रचार व विविध चर्चा सभेत सहभागी झाले. अनेक वृत्तपत्र प्रकाशित केली. दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. इ. स. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार केला. महाडचे चवदार तळे सर्वासाठी खुले केले. जातीयतेने बुरसटलेल्या कलुषित मनावर प्रहार केला. माणसाला माणसाप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे.जातीपातीच्या नावाखाली अन्याय,अत्याचार करू नये. स्वातंत्र्य,समता व बंधुता संविधानाचे दिलेले मूलभूत हक्क अबाधित रहावे.मला माझा धर्म जितका प्रिय आहे त्यापेक्षा अधिक मला इतर धर्म प्रिय आहेत ही शिकवण अंगीकारली पाहिजे.शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे.शिका संघटित होऊन संघर्ष करा.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय रहाणार नाही. बहुजन समाजातील लोकांना चांगली वागणूक मिळावी यासाठी आटोकाट प्रयत्न केला.त्यानंतर ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमीवर त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध गुरू होते. बोधीसत्व म्हणून त्यांची जगात ओळख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर “भारतरत्न’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अशा महान महा मानवास कोटी कोटी वंदन.
रत्नाकर बाबुराव पाटील
(सहशिक्षक) विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा, शिंगोली ता. जि. धाराशिव