Babasaheb Ambedkar will do the intended work! :बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत काम करणार!

बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत काम करणार!

जनतेने संधी द्यावी; भीमवंदना यात्रेत संदीप शेळकेंचे प्रतिपादन!

पातुर्डा ते गारडगाव भीमवंदना यात्रा…

गजानन काटे ः दैनिक विश्‍वजगत
शेगाव : माझ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. मी डॉ. बाबासाहेबांचा अनुयायी आहे. जनतेने लोकसभेची संधी दिली तर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने काम करेल, असे प्रतिपादन वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी केले.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पातुर्डा ते खामगाव तालुक्यातील गारडगाव अशी भीमवंदना यात्रा वन बुलढाणा मिशनच्या वतीने काढण्यात आली. यावेळी यात्रेच्या सुरुवातीला संदीप शेळके बोलत होते. वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा बुलडाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त आज भीमवंदना यात्रा काढण्यात आली. सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातुर्डा यागावातून यात्रेची सुरुवात झाली. त्यांनतर शेगाव शहर, खामगाव शहर या मार्गातून यात्रा उशिरा गारडगाव येथे दाखल होणार आहे. या यात्रेचे ठीक ठिकाणी जल्लोषात स्वागत होत असून भीमसैनिकांचा उत्साह पाहायला मिळत आहे.

पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. माणसाने जगण्यासाठी खावं आणि समाजासाठी काम करावं असं बाबासाहेब म्हणायचे. बाबासाहेब आयुष्यभर विचारांशी बांधिल राहिले, राजकीय नेता कसा असावा याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. समाजाला पुढे घेऊन जातो तो नेता, डॉ.बाबासाहेब समाजाला पुढे घेऊन जाणारे नेते होते.

राजकारण हे समाज परिवर्तनाचे माध्यम : संदीप शेळके

राजकीय व्यवस्थेपासून तुम्ही दूर राहू शकत नाही. देशाचा समाजाचा विकास करायचा असेल तर राजकाकीय व्यवस्थेचा अविभाज्य घटक होवून तुम्हाला काम करावे लागते. डॉ. बाबासाहेबांनी शोषित वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चळवळी सोबतच राजकारणाचाही उपयोग केला. राजकारण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे असे बाबासाहेब म्हणायचे. असे यावेळी संदीप शेळके म्हणाले. बुलढाणा जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष आपल्याला भरून काढायचा आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांवर मार्गक्रमण करणार असल्याचे संदीप शेळके म्हणाले.