Journalist Dr. Babasaheb Ambedkar : पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतरत्न… विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेविषयी आज चर्चा करूया ! भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा जो कालखंड आहे. त्याचा विचार केला असता प्रामुख्याने पत्रकारिता दोन उद्देशाने केली जात होती, असे म्हणावे लागेल. दोन उद्देशामधला पहिला उद्देश म्हणजे राजकीय स्वातंत्र्य प्राप्त होण्यासाठी पत्रकारिता आणि दुसरा उद्देश म्हणजे राजकीय स्वातंत्र्यासोबत सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त होण्यासाठी केलेली पत्रकारिता होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील विषमता समाजासमोर मांडली… आणि समाजामध्ये राजकीय स्वातंत्र्य सोबतच सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त होण्यासाठी पत्रकारिता केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या पत्रकारितेला १९२० पासून सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निश्चित भुमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते. १९१७ मध्ये विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना
अस्पृश्यांच्या समस्या समाजासमोर मांडण्यासाठी एखादे साधना असावे, असे वाटले. वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता. त्यांच्याजवळ विलक्षण अशा करुण कहाण्या होत्या. म्हणून, या मूक समाजाला आपल्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या वृत्तपत्राची गरज होती. या गरजेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत …. यासारखी वृत्तपत्र सुरू केलीत. समाजातील लोकांना आपल्या वेदना व विद्रोह मांडता यावा यासाठी ‘मुकनायक’ या पाक्षिकाचा ३१ जानेवारी, १९२० या दिवशी प्रारंभ झाला. या पाक्षिकाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक अशा समाजाचे नेतृत्व जाहीरपणे स्वीकारले होते. यासाठी त्यांना राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक सहकार्य लाभले होते. मूकनायक या पाक्षिकाचे धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर पुढील बिरुदावली छापली जात असे…
काय करुन आता घरुनिया भीड । निःशक हे तोड वाजविले ||1||
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण सार्थक लाजोनी नव्हे हित ||2||” जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या या ओळी त्यांनी बिरुदासाठी निवडाव्या, यात केवढे तरी औचित्य आहे. वृत्तपत्राचे ‘मूकनायक’ हे नावही त्यांना “नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण” या चरणावरुन सुचले आहे त्यानंतर १९२३ मध्ये ‘मूकनायक’ बंद पडले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक त्यांनी ३ एप्रिल १९२७ रोजी काढले. या पाक्षिकाचे ते स्वतः संपादक होते. दुसऱ्या अंकापासून बहिष्कृत भारत यावर बिरुदावली म्हणून संत ज्ञानदेवांच्या पुढील ओव्या उद्धृत केलेल्या असत… आता कोंदड घेऊनि हाती | आरुढ पांइये रथी ||१|| देई अलिंगन वीरवृत्ती समाधाने । जगी कीर्ती रुढवी स्वधर्माचा मानु वाढवी || इया भारापासोनि सोडवी मेदिनी है।आता पार्थ निःशंकु होई। या संग्रामा चित्त देई । एथ हे वाचून काही बोलो नये । |
आता केवळ संग्राम संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही. या वृत्तपत्रातील सर्व मजकूर बाबासाहेब स्वतः लिहित असत. अती व्यापातापामुळे बहिष्कृत भारत १५ नोव्हेंबर, १९२९ रोजी बंद पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वृत्तपत्रातून प्रमुख चळवळी यथार्थपणे चालविल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या कोणत्याही कृतीमुळे, कोणत्याही व्यक्तीचे बोलण्याचे, वागण्याचे आणि राहण्याचे स्वातंत्र्य हिरावल्या जाणार नाही, याची काळजी घेवू या ! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
भगवान राईतकर
(साहित्य संपादक) विवेकानंद नगर, मेहकर
मो ९७३०३३२१५१