Literature of Saints of Maharashtra ‘Gudhi’: महाराष्ट्रातील संतांच्या साहित्यातील ‘ गुढी ‘

संत हे आपल्या साहित्यमधून संस्कृती आणि परंपरा यामधील अध्यात्मिक आणि संस्काराच्या दृष्टीने त्यांचे असलेले महत्त्व आपल्या साहित्यामधून विषद करीत असतात … आणि समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करीत असतात. गुढीपाडवा आणि गुढी यासंदर्भातील संत साहित्यामध्ये असलेला उल्लेख आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया !
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक ४ , ६ आणि १४ यामध्ये गुढी विषयक संदर्भ वाचावयास मिळतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, ज्यावेळी अधर्म हा धर्माचा पराभव करीत असतो. त्यावेळी मी माझे जन्मरहीतत्व बाजूला सारतो… आणि अमूर्तत्वही आठवत नाही. तर, त्यावेळी धर्मनिष्ठावंताचा कैवार घेऊन मी साकार रूपाने अवतरतो… आणि भूतलावर निर्माण झालेला अज्ञानाचा अंधकार नष्ट करतो. अधर्माची मर्यादा तोडून टाकतो , पापांची आणि दोषांची कीर्दखतावणी फाडून टाकतो …आणि साधू, पुरुषांच्या हातून सुखाची गुढी समाजामध्ये उभारतो. असा संदर्भ आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथांमधील अध्याय क्रमांक ४ मधील ५२ क्रमांकाच्या ओवीमध्ये आढळतो. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की,
“अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५२॥
संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये गुढीचा संदर्भ ध्वजा अशा अर्थाने केलेला आपणास पहावयास मिळतो. संन्यासी तोच योगी होय , असे अनेक शास्त्राने एकवाक्यता करुन एकरुपतेची ध्वजा उभारली आहे. अशी संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमधील अध्याय ६ व्या मधीलओवीतून सांगतात की ,
“ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥
महाभारतामधील संजय आणि धृतराष्ट्र यांच्यामधील संवाद सुरू आहे. संजय भगवान श्रीकृष्णाचे वर्णन करीत असताना धृतराष्ट्र संजयला म्हणतात की , मला माझ्या मुलांच्या विजयाची बातमी सांगून माझी चिंता दूर कर. त्यावेळी संजय मनात म्हणतो की , तू या विजयाच्या गोष्टीचा विचार करू नकोस. याविषयीचा संदर्भ आपणास ज्ञानेश्वरीमधील पुढील ओवीत वाचावयास मिळतो. सदर ओवीमधील गुढी शब्दाचा अर्थ बातमी वाटतो. असे असले तरी, गुढी या शब्दाचा संदर्भ ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे . ते आपल्याला पुढील ओवीमधून लक्षात येते-
माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी ।
येरु जीवीं म्हणे सांडीं ।
गोठी यिया ॥ ४१० ॥
संत नामदेव महाराज , संत जनाबाई महाराज, संत चोखामेळा महाराज यां सर्वांच्या लेखनांत गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात की, टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥
संत चोखोबा महाराज यांच्यावरील अभंगांमध्ये त्यांनी निश्चयाची गुढी उभारण्याचा उपदेश केलेला आहे. पंढरीच्या भगवान परमात्मा पांडुरंगाची वारीचा संकल्प प्रत्येक वारकर्‍यांनी करावा, असा उपदेश प्रस्तुत अभंगातून संत चोखोबा महाराज यांनी केला आहे.
संत एकनाथ महाराजांच्या साहित्यामध्ये ‘गुढी ‘ हा शब्द अनेकदा आला आहे. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ महाराज हर्षाची उभवी गुढी , ज्ञातेपणाची , भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके आलेली आढळतात.
संत एकनाथ महाराजांना या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं, वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात. पण, मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात.
या गुढीचे अजून एक वैशिष्ट्य दिसून येते. वारी असो अथवा रणांगण असो, समूहांतील एखादा चपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे, तुकाराम गाथेतील संत तुकारामांच्या ४५२९ क्रमांकाच्या अभंगात ते म्हणतात की,
“पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥”
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपणही यशाची गुढी उभारण्याचा संकल्प करूया !

भगवान राईतकर
(संत साहित्याचे अभ्यासक व व्याख्याते)
विवेकानंद नगर, मेहकर
मो.9730332151